जालना : मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेलेल्या अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त येत असून आज उपोषणाचा त्यांचा नववा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या नऊ दिवसांपासून जरांगे-पाटील यांनी अन्न त्याग केला आहे. ते उपोषण सोडण्यास तयार नसल्याने डॉक्टरांनी नाईलाजाने अखेर त्यांना सलाईन लावले आहे.
विविध घटनांची माहिती, व्हिडीओ पाहण्यासाठी आमचे ‘सहकारनामा’ युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. काल राज्य शासनाचे शिष्टमंडळ येऊन जरांगे यांच्याशी चर्चा करून गेले मात्र मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा जी आर (GR) आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यांची तपासणी केल्यानंतर मात्र डॉक्टरांनी त्यांना आज ९ व्या दिवशी सलाईन लावण्याचा निर्णय घेत सलाईन लावली आहे.
उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावत गेली असून काल संध्याकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे डॉक्टर्स त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून होते. ‘मी आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. गरज भासल्यास सलाइन लावतो,’ अशा शब्दांत आंदोलक मनोज जरांगे यांनी मंगळवारी भूमिका मांडली होती. ‘मराठा आरक्षणासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. तुम्ही किमान एक महिना वेळ द्या,’ असे महाजन यांनी सांगितले. मात्र, त्यास जरांगे यांनी नकार दिला. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण सोडविण्यात पुन्हा अपयश आले होते.
उपोषणस्थळी मंगळवारी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, सतीश घाटगे यांनी भेट देऊन जरांगे यांची मनधरणी केली. यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा होऊन सरकारला तीस दिवसांची मुदत द्या, तांत्रिक अडचणी आहेत, समिती कदाचित दहा-पंधरा दिवसांत काम करील असे महाजन यांनी सरकारतर्फे सांगितले. मात्र, मुंबईत येण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. मराठा आंदोलक हल्ला प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी गाव बंद आंदोलने करण्यात येत आहेत.