मराठा आरक्षण | अखेर ‘मनोज जरांगे’ यांनी उपोषण सोडले, मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ यांनी ज्यूस पाजून दिले हे ‘आश्वासन’

जालना : जालना च्या अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे 17 दिवस सुरु असलेले आमरण उपोषण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन समाप्त करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे तसेच भाजप चे विविध नेते उपस्थित होते.

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी आपले मनोगत व्यक्त करत राज्यसरकारला दिलेल्या कालावधीत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे आणि आम्ही तो पूर्ण करू असे सांगितले तसेच मराठा समाजाला या अगोदर जे आरक्षण मिळाले होते ते आरक्षण रद्द झाले ते पुन्हा मिळाले पाहिजे हि आमची भूमिका आहे असे सांगितले. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. आणि ज्या अधिकाऱ्यांनी लाठी हल्ल्याचे कृत्य केले आहे त्यांच्यावर कारवाई केली आहे असे सांगितले

राज्यसरकार ने एक महिन्याची मुदत मागितल्यानंतर गावाकऱ्यांशी संवाद साधून जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला आहे. या कालावधीमध्ये राज्यसरकार ने मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असून ते कोर्टात टिकेल असे आरक्षण देण्यावर सरकारचा भर असणार आहे.

उपोषण सोडण्यासाठी या आहेत प्रमुख पाच मागण्या –

1) मराठ्यांना 31 व्या दिवशी आरक्षणाचे पत्र वाटप करावे
2) महाराष्ट्रात जेवढे आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्यात यावे व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
4) उपोषण सोडायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ यावे व छत्रपती उदयन राजे भोसले, संभाजी राजे भोसले यांनी यावे.
5) सरकारच्या वतीने हे सर्व तुम्ही आम्हाला लिहून द्यायचे (टाईम बॉण्ड लिहून द्यायचा) अश्या पाच अटी टाकण्यात आल्या आहेत.

आज गुरुवार दि.14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना ज्यूस पाजून त्यांचे आमरण उपोषण स्थगित केले आहे. मनोज जरांगे यांचे मराठा समाजासाठी सुरु असलेले उपोषण तब्बल 17 दिवस सुरु राहिले. या दरम्यान मोठ्या घडामोडी घडल्या. ज्यामध्ये आंदोलकांवर लाठीमार आणि त्यानंतर राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रिया महत्वाच्या ठरल्या.