धाराशिव : धाराशिव पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहा.पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई अश्या चार जणांच्या टीम ने एका व्यक्तीला अडकविण्यासाठी मोठे कांड केल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराला वैतागलेल्या संबंधित व्यक्तीने लाचलूचपत विभागाला तक्रार दिल्यानंतर हि संपूर्ण टीमच अँटीकरप्शन च्या जाळ्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलीस स्टेशन जि. धाराशिव येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तक्रारदारास सह आरोपी न करणेसाठी लोहारा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे, पोलीस शिपाई आकाश मधुकर भोसले, पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे, सहा.पोलीस उप निरीक्षक निवृत्ती बळीराम बोळके यांनी 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराकडे 5 लाख रूपये नसल्याने तक्रारदाराने स्वतःकडील 10 तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले होते.
हे 10 तोळ्याचे कडे त्यांनी ठेउन घेऊन तक्रारदाराला 5 लाख रुपये घेऊुन येण्यासाठी पोलीस ठाण्यातून पाठवून दिले. तक्रारदार रुपयांची जुळवणी करत असताना वरील आरोपी लोकसेवकांनी तक्रारदाराच्या भावाकडे जाऊन त्याच्याकडून परस्पर 4 लाख रुपये घेतले परंतु त्यानंतरही आरोपी लोकसेवक तक्रारदाराकडे आणखी 5 लाख रुपयांची लाच मागत असल्याने वैतागलेल्या या इसमाने अखेर लाचलूचपत विभागाकडे तक्रार केली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र मार्फत केलेल्या पडताळणीमध्ये आरोपी क्र.2 भोसले पोलीस व आरोपी क्र. 4 बोळके पोलीस यांनी तक्रारदाराकडे यापुर्वी मागितलेले पैसे आनुन देईपर्यंत तक्रारदाराचे 10 तोळ्याचे सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लोहारा पोलीस ठाणे प्रभारी स.पो.नि. ज्ञानेश्वर कुकलारे यांनी तक्रारदाराकडे पाच लाखाची प्राथमिक मागणी केल्यानंतर पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदारांच्या भावाकडून 3 लाख स्रपये स्वीकारल्याचे मान्य करून तक्रारदाराकडून आणखी 2 लाख रुपयाची लाच मागणी करून सदर लाच रक्कम आरोपी क्र. 2 पोलीस भोसले किंवा आरोपी क्र. 3 पोलीस तिगाडे यांचेकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.
वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर दि.11/11/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी क्र. 3 लोकसेवक अर्जुन शिवाजी तिघाड़े (पोलीस नाईक लोहारा पोलीस ठाणे) यांनी तक्रारदार यांच्या शेतामध्ये भातागली, ता.लोहारा, जि.धाराशिव येथे तक्रारदाराकडून 200,000/- (दोन लाख) रुपयांची लाच स्वीकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. वरील आरोपी लोकसेवक क्रमांक 1 ते 4 यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविस्द्ध लोहारा पोलीस ठाणे जि.धाराशिव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7, 7अ, 12 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची सापळा कारवाई प्रशांत चौगुले (पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि.सोलापुर) तसेच प्रवीण निंबाळकर, (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.पुणे) यांच्या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास बाळासाहेब नरवटे (पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.धाराशीव) हे करीत आहेत.







