अब्बास शेख
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड तालुक्यात राजकीय घडामोडिंना वेग आला आहे. एकीकडे ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर दुसरीकडे भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
बारामती लोकसभेसाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. साधारण 21 लाख मतदार संख्या असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात एकूण सहा तालुके येतात. यामध्ये बारामती, दौंड, इंदापूर, भोर, पुरंदर आणि खडवासला यांचा समावेश आहे. सध्या शरद पवार गट, अजित पवार गट आणि ओबीसी बहुजन पार्टीचे महेश भागवत यांच्यात चूरशीची लढत होईन असे दिसत आहे. शरद पवार गट उमेदवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गट उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मतदार विभागल्याने याचा फायदा ओबीसी बहुजन पार्टीचे महेश भागवत यांना होईल असा कयास लावला जात आहे. मात्र खुद्द ओबीसी मतदार महेश भागवत यांना किती साथ देतात यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
इकडे अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात आणि अजित पवारांचे विश्वासू समर्थक वैशाली नागवडे या गटांचा पाठिंबा आहे तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, पुरंदरमध्ये विजय शिवतारे यांचाही मोठा पाठिंबा असून महायुती एक राहिली तर त्यांचा सहज विजय होईल असे एकूण परिस्थिती आहे. शरद पवार गटानेही सुप्रिया सुळे यांच्यामागे आपल्या परीने मोठी ताकद लावली असून त्यांनी दौंडमध्ये भाजप माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे तर इंदापूरमध्ये जगदाळे यांना आपल्याकडे खेचण्यास यश मिळवले आहे.
दुसरीकडे दौंड तालुक्यात आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, अजित शितोळे आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते हे पवारांच्या पाठीशी उभे असून त्यांनी यवत येथील शेतकरी मेळावा यशस्वी करून दाखवला आहे. इंदापूर, भोर आणि इतर ठिकाणीही शरद पवार गटाने गनिमीकावा करत अनेक पदाधिकारी आपल्याकडे वळविण्यास यश मिळवले आहे. एकूणच यावेळी तीन दिग्गज उमेदवार बारामती लोकसभेसाठी रिंगणात उतरले असून यात कुणाला जनमत मिळते हे लवकरच समजणार आहे.