भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक हर्षोल्लासात साजरा

दौंड : दौंड शहरात जैनांचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांनी हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. परंपरेप्रमाणे तीन संप्रदायांनी एकत्र येत एकच भव्य मिरवणूक काढत उपक्रमांचे संयोजन केले.
दौंड शहरातील सकल जैन संघाच्या वतीने श्री विमल – पार्श्वनाथ जैन मंदिर येथून सुरवात करून आज (ता.१४ ) भगवान महावीर यांच्या पंचधातूची मूर्ती व तैलचित्राची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांचा जयघोष करण्यासह जीओ और जीने दो, आदी घोषणा देण्यात आल्या. हातात पंचरंगी ध्वज घेत युवक – युवती आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर व माजी नगराध्यक्षा शीतल कटारिया यांनी प्रतिमा पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले. शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत श्री जैन स्थानक येथे सदर मिरवणूक विसर्जित करण्यात आली. आमदार राहुल कुल यांनी जैन स्थानकात जैन बांधवांना जन्म कल्याणक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. भगवान महावीर यांची महती सांगणारे स्तवन गायनानंतर मंगपाठाने सांगता करण्यात आली.
जैन स्थानक येथे सकाळी प्रार्थना करण्यात आली आणि दुपारी भगवान महावीर जन्मवाचन करण्यात आले. श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर आणि श्री विमल – पार्श्वनाथ जैन मंदिरात विधिवत अभिषेक करून पूजा
अर्चनेसह महाआरती करण्यात आली.
जैन बांधवांनी जन्म कल्याणक निमित्त निरंकार उपवास, आयंबिल, एकासना, कंदमूळ त्याग, आदी जप – तप व दान करून भगवान महावीर यांची आराधना केली.