दौंड : विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येकजण आपल्या मनासारख्या पक्षात आपापली उमेदवारी पक्की करण्यासाठी धडपडत आहे. हे होत असताना मागील इतिहासाचा दाखला घेतला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जेष्ठ नेते शरद पवारांच्या तुतारी ने चांगल्या चांगल्या दिग्गजांना पाणी पाजत इतिहास रचला आहे. त्यामुळे आपल्यालाही तुतारीची उमेदवारी मिळावी म्हणून विधानसभेला इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेष्ठ नेते मंडळींना गळ घालण्यास सुरुवात केली आहे.
असाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यात सुरु असून येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मात्र आयात उमेदवारांना प्रखर विरोध सुरु केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन रामभाऊ टुले आणि वरवंड येथील जेष्ठ कार्यकर्ते दीपक दिवेकर यांनी याबाबत बोलताना, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मागे जे ठामपणे उभे राहिले आणि ज्यांनी त्यांचे निष्ठेने काम केले त्यांनाच तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्याची संधी मिळावी आणि यात सर्वात पुढे नाव हे अप्पासाहेब पवार यांचे असून आम्ही शरद पवारांच्या निष्ठावंत उमेदवारांसोबत कायम उभे असल्याचे सांगितले.
मात्र लोकसभेला विरोधात काम करणाऱ्या आणि पवार साहेबांवर टीका करणाऱ्या अनेकांनी वातावरण पाहून आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची लगबग सुरु केली असून अश्या आयात उमेदवारांचे काम मात्र आपण करणार नसल्याचे दीपक दिवेकर यांनी सांगितले आहे. तर आपण फक्त पवार साहेबांच्या निष्ठावंत उमेदवारांचेच काम करणार असल्याची भूमिका कात्रज दूध संघाचे माजी चेअरमन रामभाऊ टुले यांनी घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाणार याची उत्सुकता तालुक्याला लागून राहिली आज.