दौंड मध्ये भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अख्तर काझी

दौंड : जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांची जयंती शहरात विविध धार्मिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जैन बांधवांकडून जप- तप व दान करून भगवान महावीर यांची आराधना करण्यात आली. शहरातील श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातील प्रवचन हॉल येथे नवकार महामंत्राचे सामूहिक जप करण्यात आले. मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होते.

जैन समाजातील आचार्य व संत वृंदांच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्था आणि संघटनांच्या पुढाकाराने विश्व कल्याणाकरिता आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल व्हावी याकरिता हा महामंत्र जाप करण्यात आला. मंगल पाठाने या विशेष जपाची सांगता करण्यात आली. जैन धर्मीयांचे 24 तीर्थंकर, वर्तमान जिनशासन नायक श्री महावीर स्वामी यांच्यासह सर्व आचार्य ,साधू व साध्वी यांचा यावेळी जयघोष करण्यात आला.
जयंती निमित्ताने श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातून पालखी काढण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री विमल पार्श्वनाथ जैन मंदिरात स्नात्र पूजा करण्यात आली. परंपरेप्रमाणे तीन ही संप्रदायांनी एकत्र येत श्री सकल जैन संघाच्या वतीने भगवान महावीर यांच्या पंचधातूची मूर्ती व तैलचित्राची जैन मंदिर येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. जिओ और जीने दो, त्रिशला नंदन वीर की जय बोलो भगवान महावीर की असा जयघोष यावेळी करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रभागी अश्वारूढ बालकांनी पंचरंगी ध्वज घेतले होते. महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होते. येथील विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिमा पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले.


जैन बांधवांनी व्यक्त केली नाराजी
महावीर जयंती निमित्ताने निघालेल्या शोभायात्रेचे दरवर्षी दौंड नगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येते. मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी किंवा अन्य अधिकारी भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जैन बांधवास जयंतीच्या शुभेच्छा देतात. परंतु यावर्षी नगरपालिकेने ही परंपरा पाळली नाही. नगरपालिकेच्या वतीने यावेळेस शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले नाही, एकही अधिकारी, कर्मचारी यावेळेस उपस्थितही नव्हते. नगरपालिकेच्या या वेळेसच्या भूमिके बाबत जैन बांधवांनी नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी किंवा अन्य अधिकारी यांच्याकडे शोभायात्रेचे स्वागत करण्या करिता वेळ नव्हता का? की शोभा यात्रेचे स्वागत नगरपालिकेकडून करण्यात येते याचाच विसर यांना यावेळेस पडला आहे का? असा सवाल जैन बांधवांकडून उपस्थित केला जात आहे.