अब्बास शेख
पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमार झाल्याची घटना घडली असून या घटनेने आता उग्ररूप धारण केल्याचे दिसत आहे. या लाठीमार बाबत आता सरकारकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या असून यातील दोषी अधिकारी, पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आली असून, जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार तसेच रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
तर जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत, जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी केले आहे. या लाठीमारातील जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात सरकारप्रति नाराजीची भावना बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे सरकारने यातील दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.