कोल्हापूर : आज रात्री आठ वाजता कोल्हापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा सुरु झाली. या सभेमध्ये अजित पवारांनी मोठ मोठे खुलासे करत खळबळ उडवून दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच बोलताना, होय आमच्यावर सरकारमध्ये जाण्याचा दबाव होता, पण तो दबाव अन्य कुणाचा नसून लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता, आमदारांच्या कामावर स्थगितीचा दबाव होता मात्र दुसरा कोणताही दबाव नव्हता. कुणी काहीही म्हणेल पण आमच्यावर कुणाचाही आणि कसलाही दबाव नव्हता. काहीजण बातम्यातून अफ़वा पसरवतात. काहीही बोलतात, उचलली जीभ लावली टाळ्याला असं म्हणत आम्ही स्वार्थासाठी महायुतीत गेलेलो नाही तर लोकांच्या कामासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
ठाकरेंच सरकार पडत असताना काहींनी युतीमध्ये सामिल होण्याचे पत्र दिलं होतं. मात्र आम्ही तसं केलं नाही हे जर खोटं असेल तर राजकारण सोडील असे त्यांनी सांगितले. मात्र हा बाण नेमका त्यांनी कोणावर रोखला याची चर्चा संपूर्ण सभेत सुरु झाली. ठाकरे सरकार पडत असताना युतीमध्ये सामिल होण्याचे पत्र कुणी दिलं असेल यावरही आता मोठे तर्कवितर्क लावले जात आहेत.
मराठा आरक्षणावर भाष्य.. मराठा समाजाला आरक्षण देण्यावर सरकार गंभीर आहे. आम्ही आर्थिक दुर्बल असणाऱ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. हेच मनोज जरांगे यांना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे. ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे असं आरक्षण देण्यावर भर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.