Kolhapur | आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर ‘शासन आपल्या दारी कार्यक्रमाला हजेरी’ पण दौऱ्याला ‛वादाची किनार’

कोल्हापूर (सुधीर गोखले) : ‘शासन आपल्या दारी’ या राज्यशासनाच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरात येत असून विकासकामे, टक्केवारी वरून शिंदे आणि ठाकरे गटातील वाद उफाळण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. तर, विरोधी आमदारांनी जिल्हा नियोजन निधीमधील असमानते बरोबर नाराजीला तोंड फुटले आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या हिंसाचाराचे पडसादही या वेळी विरोधकांकडून उमटण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे गटाने कोल्हापुरातील ऐतिहासिक राजाराम तलाव आणि कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पावरून आंदोलन तापवत ठेवले आहे.

या तलाव परिसरात कन्व्हेन्शन सेंटर उभे करण्यासाठी शासनाने १ लाख ३७ हजार चौरस फुट क्षेत्रात बांधकाम होणाऱ्या या कामासाठी १०० कोटी रुपये खर्चास गेल्या महिन्यात मंजुरी दिली होती.
दंगलीच्या राजकारणाची किनार
कोल्हापुरातील दंगलीचे वातावरण आता थंडावले असले तरी राजकीय टीकाटिपणी सुरू आहे. जिल्ह्यातील उभय काँग्रेस, पुरोगामी पक्षांनी यावर बोलण्याचे टाळले आहे. तरी राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार हे मात्र (एकटेच) तातडीने दाखल झाले. ‘दंगल घडली की घडवली ?’ असा प्रश्न त्यांनी राज्यकर्त्यांना केला आहे. राज्यातील ‘मविआ’च्या वरिष्ठ नेत्यांनी असाच टीकात्मक सूर लावला आहे.