मुंबई : लोकशाही (Lokshahi News channel ) वृत्त वाहिनीने भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या व्हायरल व्हिडीओ (viral video) ची बातमी दाखवून एकच खळबळ उडवून दिली होती. या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून लोकशाही न्यूज चॅनेलचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा व्हायरला व्हिडीओ दाखविण्याची आणि त्यावर चर्चा घडवून आणण्याचे मोठे धाडस लोकशाही न्यूज चे संपादक कमलेश सुतार यांनी केले होते. मात्र आता त्यांच्यावर आणि अनिल थत्ते यांच्यावर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकशाहीवर दाखविण्यात आलेल्या व्हायरल व्हिडीओबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात येऊन याबाबत सायबर पोलिसांनी तपास हाती घेतला होता. मंगळवारी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आपला जबाब दिल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ लोकशाहीने समोर आणल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. नेत्यांच्या असल्या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. लोकशाही न्यूज चॅनेलने हे वृत्त 17 जुलै रोजी प्रसारित केले होते. या वृत्तानंतर विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला होता. याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही हा मुद्दा सभागृहात मांडत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आमच्या कानावर आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी सभागृहात बोलताना केला होता. तसेच किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला होता. या सर्व प्रकारानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.