मुंबई : काल एका वृत्तवाहिनीवर भाजप चे माजी खासदार किरीट सोमय्या यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि संपूर्ण राजकीय जगतामध्ये खळबळ माजली. या क्लिप नंतर किरीट सोमय्या काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र आता किरीटी सोमय्या यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
किरीट सोमय्या यांनी विरोधकांमधील भल्याभल्यांना त्यांच्या बेहोशोबी मालमत्ता अथवा एखादा घोटाळा बाहेर काढून घाम फोडला होता मात्र किरीट सोमय्या यांच्या व्हिडिओमध्ये त्यांचाच घाम निघत असल्याचे दाखविण्यात आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे.
या सर्व प्रकाराबाबत आता किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना, माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असं त्यांनी म्हटलं असून त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत तसेच या सर्व प्रकारची गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांचे तब्बल 35 आक्षेपार्ह व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असल्याचे बोलले जात असून त्यांनतर राजकीय नेतेमंडळींनी सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे.
किरीट सोमय्या यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
मा. देवेंद्रजी, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो.
त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे. कळावे.
अश्या प्रकारचे पत्र किरीट सोमय्या यांनी फडणवीस यांना लिहिले आहे.