केडगावचे सरपंच राजकीय षडयंत्राचे बळी! सरपंचांच्या ‛त्या’ निर्णयाविरोधात जनतेत तीव्र ‛संताप’

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अजित शेलार यांनी अचानकपणे आपण आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले अण केडगावमध्ये राजकीय चर्चांना एकच उधाण आले. शांत, सय्यमी आणि कुणाला दुखावण्याची मानसिकता, स्वभाव नसणारे सरपंच हे राजकीय षडयंत्राचा बळी ठरत असल्याची मोठी चर्चाही केडगावमध्ये सुरू आहे. आणि त्यातूनच आता सरपंचांनी राजीनामा देऊ नये, खंबीरपणे लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असा जाहीर पाठिंबा त्यांना सोशल मीडियावरून केडगावचे नागरिक देत आहेत.

हे होत असताना सरपंच अजित शेलार यांनी रीतसर राजीनामा देण्यासाठी सभापतींना भेटण्याची तयारीही सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत असून सरपंचाच्या राजीनाम्याला मात्र आता जनतेतून मोठा विरोध होऊ लागला आहे. अजित शेलार यांनी राजीनामा देऊ नये, ते थेट लोकमतातून निवडून आले आहेत. त्यांच्यावर येत असलेला राजकीय दबाव हा जनतेला माहीत आहे. सरपंचाने आमचेच ऐकावे, आम्ही म्हणू तीच कामे करावी, जो आमच्याशी गोड त्याचे काम पहिले, जो आमच्याशी वाईट त्याला ताटकळत ठेवा असा जणू काही नियमच गावपुढाऱ्यांनी बनवून त्यात सरपंचांचा राजकीय बळी देण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता चौका चौकात लोकांमध्ये सुरू झाली आहे.

सरपंचाला विरोध हा विरोधी गटातून होतो. येथे मात्र परिस्थिती एकदम उलट असल्याचे पाहायला मिळत आहे. सरपंचांनी सोशल मीडियावर राजीनामा देत असल्याचे जाहीर करताच काही राजकीय मंडळींना उकळ्या फुटून पुढील सरपंच कोण करायचा याबाबत चर्चाही सुरू झाली आहे. राजकीय गावपुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे ज्या ग्रामपंचायतीमध्ये 3-4 महिन्याच्या पुढे ग्रामसेवक टिकत नाहीत, तेथे सरपंच तरी किती दिवस टिकणार असा मिश्किल टोला आता लोक चर्चेतून लगावताना दिसत आहेत.

केडगाव हे गाव कमी शहर म्हणून आता नावारूपास येत आहे. त्यामुळे जसजसे हे शहर वाढत आहे. तसतशी येथील राजकीय परिस्थितीही बदलत चालली आहे. येथील राजकीय परिस्थिती सध्या अशी आहे की तुम्ही आमच्या वरच्या नेत्यांना माना अगर नका मानू पण आम्हाला मानायचेच. आणि जर आमचे ऐकले नाही, आम्हाला विरोध केला तर गटाला कितीही फटका बसला तरी चालेल पण तुम्हाला गटातून बाहेर काढून आम्ही आमची हेकेगिरी, हुकूमशाही अबाधित ठेऊ अशी या लोकांची मानसिकता बनली असल्याचे येथील एका जाणकार, मुरब्बी राजकीय व्यक्तीने आपले नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.

हे सर्व सुरू असताना जनमतातून निवडून आलेले  केडगावचे सरपंच अजित शेलार हे आता नेमका कोणता निर्णय घेतात. लोकांची विनंती मान्य करून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतात की राजकीय दबावाला बळी पडून राजकारणाला कायमचा राम राम करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.