केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून तो आता हायटेक होताना दिसत आहे. केडगावमध्ये जनसेवा चारचाकी वाहनात टीव्ही स्क्रिन बसवून तिच्या माध्यमातून हायटेक प्रचार केला जात आहे. या टीव्ही स्क्रिनमध्ये गावचा सर्वांगीण विकास अश्या पद्धतीने करू, आम्हाला पुन्हा निवडून द्या असे आवाहन केले जात आहे. या जाहिरातींचा माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या केडगावच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलमधील पदाधिकाऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
‘दहा वर्षे सत्ता’ होती त्यावेळी हा विकास का करण्यात आला नाही असा सवाल ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे पदाधिकारी आणि माजी आमदार रमेश थोरात गटाचे संतोष देशमुख यांनी उपस्थित करत या फसव्या जाहिरातबाजीला आता जनता भाळणार नाही असे म्हटले आहे. संतोष पांडुरंग देशमुख यांनी विकासाच्या मुद्दयांवर बोलताना, केडगावामध्ये सत्ताधाऱ्यांची दहा वर्षे सत्ता असताना विकास कुठेच दिसला नाही, गावातील मुख्य रस्ते झालेच नाहीत, जे रस्ते करण्यात आले त्याचे निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने या रस्त्यांची अवस्था बिकट बनली आहे.
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. लोकांच्या राहत्या घरांवर नोटीसा काढण्यात आल्या. आम्ही म्हणू तसे करावे लागेल नाहीतर… अश्या पद्धतीने मागील काळात नागरिकांना धमक्या दिल्या जात होत्या. दहा वर्षे एकहाती सत्ता असूनही केडगावच्या सहा वार्डमध्ये ठळक असा कोणताच विकास केला गेला नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांविषयी जनतेमध्ये कमालीची नाराजी असून येणाऱ्या 5 तारखेला जनता यांना जागा दाखवणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.