सांगली : आज सांगली आणि बारामती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘महानिर्धार २०२४’ संवाद मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मनोगतामध्ये भाजपवर घणाघाती टीका केली तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या दुभाषी व्यक्ती च्या मदतीने सांगलीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
सांगलीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह मान्यवरांनी सिद्धरामय्या यांचे स्वागत केले. या स्वागताने भारावलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वागत केल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी जिल्हयातील धनगर समाजाचेही त्यांनी आभार मानले. पुढे बोलताना, सांगली जिल्हा हा स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्या नंतरच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा म्हणजे माजी मुख्यमंत्री डॉ. वसंतदादा पाटील कै. डॉ. पतंगराव कदम यांच्यासारख्या थोर सुपुत्रांचा जिल्हा आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यंशवंतराव चव्हाण यांनी नव्या महाराष्ट्राला आधुनिकतेकडे घेऊन जाण्याची दिशा दाखवली तसेच माजी मुख्यमंत्री कै. डॉ. वसंतदादा पाटील यांचेही सहकार क्षेत्रामधील योगदान विसरून चालणार नाही तसेच काँग्रेस पक्षासाठी चे त्यांचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस चे जेष्ठ नेते कै डॉ पतंगराव कदम यांनी सुद्धा राजकीय तसेच सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक कार्यात सुद्धा आपला ठसा उमटवला आहे तो चिरंतन लक्षात राहील तशीच वाटचाल आता त्यांचे सुपुत्र माजी मंत्री डॉ विश्वजित हे करत आहेत हे पाहून आपणास आनंद वाटत असल्याचे म्हणाले.
भाजप ने ‘ऑपेरेशन लोटस’ करून आमदारांना विकत घेऊन कर्नाटकमध्ये सत्ता मिळवली होती. मात्र यावेळच्या निवडणुकीत भाजपची जागा हि कर्नाटक मधल्या सुज्ञ मतदारांनी दाखवली आणि यावेळी काँग्रेसकडे सत्तेची सूत्रे सुपूर्द केली आहेत. निश्चित पणे महाराष्ट्रातही २०२४ मध्ये सत्ताबदल निश्चित होईल अशी मी आशा करतो असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी या महानिर्धार मेळाव्याचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदम, काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ.प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील, मिरज शहर काँग्रेस अध्यक्ष आणि नगरसेवक संजय मेंढे, मनपा मधील काँग्रेस चे नगरसेवक आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.