महिला व मुलींनी अन्याय सहन न करता बोलते व्हावे यासाठी पोलीस निरीक्षक यांची अनोखी संकल्पना, मुली व महिलांच्या संरक्षणासाठी आता शाळा व सार्वजनिक ठिकाणी ‘आवाहन फलक’

कर्जत : कर्जत तालुक्यातील शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी मुली व महिलांना होणाऱ्या त्रासावर आळा घालण्यासाठी कर्जतच्या पोलीस निरीक्षकांनी आता भन्नाट उपक्रम राबविला आहे. सर्व शाळा-महाविद्यालये व बसस्थानकात कर्जत पोलीस स्टेशन व २४ तास सुरू असलेला हेल्पलाईन नंबर तसेच स्वतःचा संपर्क क्रमांक असलेले 'आवाहन फलक' लावण्याचे काम सुरू आहे. हे फलक मुली व महिलांसाठी ढाल म्हणून करणार आहेत.

मागील काळात महिला-मुलींना त्रासाबाबतच्या अनेक तक्रारींचा आलेख पाहता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन मुली-महिलांना निर्भयतेचे धडे दिले. 'कुणी जर त्रास दिला तर कायदेशीर कारवाई करू' असे आश्वस्त केले. संपर्कासाठी क्रमांक उपलब्ध करून दिले. तक्रार दिल्यानंतर तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येत असल्याने शेकडो तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या. अनेक मुली-महिलांनी स्वतः यादव यांना फोनवरून तक्रारी केल्या.गुदमरलेल्या अनेक मुलींचा श्वास यादव यांनी क्षणात मोकळा केला. महिला सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेकांवर कायदेशीर कारवाया केल्या. मुलींना पोलीस ठाण्याबाबतच्या कामकाजाची माहिती व्हावी तसेच तक्रार कशी दाखल करावी?पोलिसांचे काम कसे चालते? याबाबत माहिती मिळावी म्हणून मुलींसाठी पोलीस ठाण्यात वेळोवेळी सहलीचे आयोजन केले.

असे असताना जेंव्हा मुली शाळा महाविद्यालय भरताना व सुटताना सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यासोबत असे अनुचित प्रकार घडतात अशावेळी पोलीस यंत्रणेला संपर्क साधता येत नाही मात्र अशावेळी हे आवाहन फलक 'ढाल' बनून मुलींचे रक्षण करणार आहेत. हे फलक लावताना स्वतः पोलीस निरीक्षक हे विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांना या फलकाविषयी माहिती देत आहेत. जेंव्हा कोणतीही मदत मिळणार नाही तेंव्हा हे फलकच 'संकटकालीन मार्ग' म्हणून काम करणार आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत असतात मात्र अनेक योजना कुचकामी ठरतात. पोलीस निरीक्षक यादव यांनी मुली- महिलांच्या सुरक्षिततेसाठी आत्तापर्यंत अनेक संकल्पना राबवल्या.त्यामुळे पोलिसांबाबत असलेली भीती, गैरसमज दूर होण्यास मदत झाली. अनेक मुलींना न्याय मिळवून देऊन विश्वास संपादन केला. हे फलक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा, कॉलेज, बस स्थानक, मुलींचे वसतिगृह तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत आहेत.

आज रोजी सदरचे फलक दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी शाळा, कोटा मेंटर शाळा तसेच दोन मुलींचे वसतीग्रह, कर्जत बस स्थानक या ठिकाणी लावण्यात आले. यावेळी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नगरकर तसेच पत्रकार गणेश जेवरे मोतीराम शिंदे अफरोज पठाण आशिष बोरा पोलीस जवान मनोज लातूरकर, शकील बेग हे उपस्थित होते. हे बोर्ड लावण्या कामी श्री माऊली कदम, जय फेब्रिकेशन, राशीन यांनी आर्थिक सहकार्य दिले त्यासाठी त्यांचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आभार मानले.

असा आहे आवाहन फलक

“सर्व विद्यार्थिनी व महिलांना सुचित करण्यात येते की,उच्च माध्यमिक,महाविद्यालयीन विद्यार्थी,शाळाबाह्य मुले,पुरुष तसेच ओळखीच्या अनोळखी लोकांनी आपल्याला वाईट उद्देशाने टक लावून पाहणे,मागे फिरणे,इशारे करणे,वारंवार फोन मॅसेज करणे,धमकावणे,प्रवासामध्ये जवळ बसण्याचा प्रयत्न करणे व इतर अशा कोणत्याही प्रकारचा त्रास दिल्यास आपण न घाबरता कर्जत पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी”

आवाहन फलक असे करेल काम

“कोणत्याही पीडित मुली-महिलेसोबत कुणी ओळख-अनोळखी व्यक्ती छेडछाड किंवा चुकीचे वागत असेल तर तिला तात्काळ पोलिसांशी संपर्क साधता येईल. जर संपर्क साधने शक्य नसल्यास हा प्रकार पाहणारे प्रत्यक्षदर्शी नागरिक या आवाहन फलकांवरील क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना कळवू शकतात.विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येत असल्याने अशा घटना रोखता येतील.”