कर्जत : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत च्या आळसुंदे गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्जतच्या आळसुंदे गावातील ही घटना असून मोठी मुलगी ऋतुजा (वय 8 वर्षे) आणि लहान मुलगा वेदांत (वय4 वर्षे) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
गोकुळ जयराम क्षिरसागर (रा.आळसुंदे, कर्जत, अहमदनगर) असे या निर्दयी पित्याचे नाव असून त्याने आपल्या दोन मुलांना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केली आणि नंतर आपण आपल्या मुलांना विहिरीत ढकलून दिल्याचे त्याने आपल्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी घराजवळील विहिरीत या मुलांचा शोध घेतला असता त्या विहिरीत ही दोन्ही मुले आढळून आली.
त्यानंतर गावकरी आणि नातेवाईकांनी या दोन्ही मुलांना विहिरीतून बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाल्याने या दोन्ही चिमुरड्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित करताच या चिमुरड्यांच्या आई ने आणि नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. नराधम पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.