दौंड : एखादी व्यक्ती जी कायम आपल्या सुख-दुःखात आपल्यासोबत असते, आपण त्या व्यक्तीच्या गावात गेलो तर हातातील कामे सोडून आपल्या स्वागताला हजर होते आणि अचानक त्याच व्यक्तीच्या मृत्यूची बातमी आपल्या कानावर आली तर आपली काय अवस्था होते हे न सांगितलेलंच बरं. असाच प्रसंग आमदार राहुल कुल यांच्या पत्नी अण भाजप च्या प्रदेश कार्यकारिणीच्या नेत्या कांचन कुल यांच्यासोबत घडला आहे. त्यांच्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या कार्यकर्त्या लताबाई बबन धावडे (वय 50, रा.कडेठाण. ता.दौंड. जि.पुणे) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मिळताच कांचनताई कुल यांना अश्रू अणावर झाले. नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी लताबाई धावडे यांच्या अंत्यविधीला हजेरी लावून धावडे कुटुंबाचे सांत्वन केले.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आपल्या सोबत गावातील प्रत्येक गल्ली बोळात फिरून आमदार राहुल कुल यांचा प्रचार करणाऱ्या आणि दादा निवडून आल्यानंतर डिजेवर ठेका धरणाऱ्या लताबाई यांचा अश्या प्रकारे अचानक मृत्यू झाल्याची बातमी कळताच कांचनताई कुल यांना मोठा धक्काच बसला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कांचनताई यांनी लागलीच आमदार राहुल कुल यांना फोन केला.
आमदार राहुल कुल यांनीही लागलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लताबाई धावडे यांच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती दिली. तसेच लताबाई यांच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक मदत मिळावी आणि नरभक्षक बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली. कडेठाण येथे गेल्यानंतर हातातील कामे सोडून कायम कांचनताई कुल यांच्यासोबत राहून त्यांना गावातील परिस्थितीची माहिती देणाऱ्या लताबाई धावडे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने कांचन कुल ह्या व्यथित झाल्याचे दिसले. लताबाई धावडे यांच्या अंत्यविधीला कांचन कुल यांनी उपस्थित राहून साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.