मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा करून आपल्या सर्व उमेदवारांनी फॉर्म माघारी घ्या, कुणीही निवडणूक लढवू नका असे आदेश आपल्या उमेदवारांना दिले आहेत.
यावेळी जरांगे पाटलांनी बोलताना, मित्रपक्षांची कोणतीही यादी न आल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं असून काल दिवसभर मतदारसंघनिहाय चर्चा झाली. मित्र पक्षांची पहाटे 3 वाजेपर्यंत यादीच आलीच नाही. आपले कुणीच नाही त्यामुळे कुणालाच समर्थन द्यायचं नाही, असं आपण ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं आणि एका जातीवर निवडणूक लढवणं कसं शक्य आहे. मी राजकारणात नवीन आहे. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घ्या – उमेदवारांबद्दल बोलताना, आपण सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. ह्याला पाड त्याला पाड ही भूमिका आपली नाही. उमेदवार पाडण्याची माझी इच्छा नाही. मात्र भूमिकेशी सहमत नसलेल्या उमेदवारांना पाडणार असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
दबाव नाही – जरांगे पाटलांनी घोषणा करताच वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले, त्यामुळे माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो मी कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. यादीच नाही तर मी तरी काय करणार. मी माझी भूमिका बदलत नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी शेवटी म्हटलं आहे.