दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
पुण्यात लॉन्ड्री व्यवसाय करणारे सोमनाथ वामन अभंग (रा. दत्तवाडी, पुणे) यांची ऑक्टोबर 2016 साली चोरीला गेलेली दुचाकी दौंड पोलीस स्टेशनचे कारकून बापू रोटे यांच्या प्रयत्नामुळे ऍन दिवाळीत त्यांना परत मिळाली आहे.
अभंग यांची दुचाकी ऑक्टोबर 2016 ला पुण्यातील बिबवेवाडी येथील इमारतीच्या पार्किंग मधून चोरीला गेलेली होती. अभंग यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार सुद्धा नोंदविली होती, परंतु इतके वर्ष आपल्या दुचाकीचा तपास लागत नसल्याने दुचाकी सापडेल ही अशाच अभंग यांनी सोडून दिली होती. परंतु अचानकपणे दौंड पोलीस स्टेशन चे कारकून बापू रोटे यांचा अभंग यांना संदेश मिळाला की त्यांची गाडी दौंड पोलीस स्टेशनला आहे व त्यांनी ती परत घेऊन जावी, त्या अनुषंगाने अभंग आज (दि.5) रोजी दौंड पो. स्टेशनला आले. दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या उपस्थितीत अभंग यांच्याकडे त्यांची दुचाकी सुपूर्त करण्यात आली.
या बाबत बापू रोटे यांनी सांगितले, दौंड पोलीस स्टेशन हद्दीत 85 बेवारस वाहने सापडलेली आहेत. त्या वाहनांच्या नंबर व चासी नंबर वरून आम्ही मूळ मालकांचा तपास करीत आहोत. तपास करीत असताना त्यापैकी एक गाडी पुण्यातील सोमनाथ अभंग यांची असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्याशी पत्र व्यवहार करून त्यांची दुचाकी आज त्यांच्या स्वाधीन करण्यात आली. उर्वरित 84 दुचाक्या सुद्धा त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे रोटे यांनी सांगितले.
उपस्थित पत्रकारांनी अभंग यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, माझा पुण्यात छोटासा लॉन्ड्री चा व्यवसाय आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून बचत करीत ही दुचाकी खरेदी केलेली होती. तीच चोरीला गेल्याने दुःख होते, चार वर्षापूर्वी चोरीला गेलेली दुचाकी पुन्हा मिळेल अशी आशाच नव्हती. परंतु दौंड पोलीस स्टेशनचे बापू रोटे यांच्या प्रयत्नामुळे मला माझी दुचाकी पुन्हा मिळाली.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गाडी मिळाल्याचा खूप आनंद होत आहे, दौंड पोलिसांकडून मला दिवाळी बोनस मिळाल्या सारखेच वाटत आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी बापू रोटे यांच्या कामाचे कौतुक केले.