दौंड नगरपरिषद आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

अख्तर काझी

दौंड : दौंड नगरपरिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दौंड नगरपरिषद टाऊन हॉल व कार्यालयात संपुर्ण रंगरंगोटी, रांगोळी तसेच रोषणाई करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवाचे ध्वजारोहण मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर तिरंगा रंगाचे ७५ फुगे हवेत सोडून वैचारिक स्वातंत्र्याचा संदेश देण्यात आला.

दौंड नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानांतर्गत दौंड येथील विरंगुळा केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर दौंड नगरपरिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्रावर बांधकाम पर्यवेक्षक जिजाबा दिवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत दौंड नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर नवीन रोपवाटिकेचे उदघाटन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात आपणाला वृक्षारोपणासाठी दौंड नगरपालिकेची हक्काची रोपवाटिका उपलब्ध झाली असल्याने यापुढे वृक्षाची कमतरता भासणार नाही तसेच सदर रोपवाटीकेमधील रोपे सत्कार समारंभासाठी, विविध ठिकाणच्या वृक्षारोपणासाठी जावीत अशी सुचना अधिकारी वर्गाला केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा. मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.