इंदापूर | शासकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री आल्यास तेथे स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण देणे हा प्रोटोकॉल आहे. कारण शासकीय कार्यक्रम हा जनतेचा असतो, कुण्या एका पक्षाचा असत नाही. परंतु इंदापूर येथे तसे झाले नाही त्यामुळे मी या कृतीचा निषेध करते असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट करताना, मा. प्रल्हादजी पटेल काल इंदापूर येथे केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ या शासकीय कार्यक्रमाच्या भूमीपुजन आणि उद्घाटनासाठी आले होते. शासकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री आल्यास तेथे स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण देणे हा प्रोटोकॉल आहे. कारण शासकीय कार्यक्रम हा जनतेचा असतो, कुण्या एका पक्षाचा असत नाही. परंतु तसे झाले नाही.
महत्वाची नमूद करण्याची बाब अशी की, ‘जल जीवन मिशन’च्या अंतर्गत आपल्या मतदारसंघात कामे व्हावी यासाठी माझ्यासह इंदापूरचे आमदार व माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आवश्यक त्या पातळ्यांवर उचित पाठपुरावा केला होता. यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला, ही वस्तुस्थिती आहे. शासकीय कार्यक्रमात राजकीय हेवेदावे, पक्षीय मतभेद, मनभेद आदी दूर ठेवायचे असतात. परंतु या संकेताला पुर्णतः हरताळ फासून व स्थानिक लोकप्रतिनिधिंना डावलून हा कार्यक्रम फक्त भाजपाचा राजकीय कार्यक्रम असावा यापद्धतीने पार पाडण्यात आला. हे अतिशय संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. या मनोवृत्तीचा मी निषेध करते असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.