पिडीसीसी बँकेकडून महिला बचत गटांच्या कर्ज योजनेत 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत वाढ, मा. आ. रमेश थोरात यांच्या हस्ते केडगाव येथे शुभारंभ

केडगाव /दौंड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक केडगाव (ता.दौंड) शाखेच्या वतीने महिला बचत गटांसाठी कर्ज मर्यादेची रक्कम ही 7 लाख 50 हजार रुपये पर्यंत करण्यात आली असून त्याचे वाटप माजी आमदार रमेश थोरात यांच्याहस्ते पार पडले.

बचत गटाच्या माध्यमातून स्त्रीयांना रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही गोष्टी मिळत आहेत. महिला बचत गट ही एक योजना नसून महिलांचे सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिक सशक्तीकरणाची सुप्त चळवळ बनली आहे असे मत यावेळी मा.आमदार तथा जिल्हाबँकेचे मा. अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त करत, बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती निर्माण झाली आहे. तसेच बचतगट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनविण्यासाठी उत्तम संधी असल्याचे त्यांनी म्हटले.

विविध व्यावसायातून महिलांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याबरोबरच, महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि महीलांच्या सक्षमीकरणासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कर्जवाटप योजनेवेळी महिला बचत गटाच्या महिला भगिनी, केडगाव शाखेचे अधिकारी ,सेवकवर्ग उपस्थित होते.