‛पारगाव’ येथे ‛चोर’ समजून काहींना बेदम ‛मारहाण’, पोलीस तपासात ‛ही’ माहिती आली समोर

दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) येथे काल रात्री च्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीतून प्रवास करणाऱ्या महिला आणि पुरुषांना चोर समजून गावातील काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पारगाव येथे काल रात्री 12 वाजता पारगावमधील युवकांनी 6 जणांना चोर समजून पकडले. या सहा जणांमध्ये 3 पुरुष, 2 महिला व 1 अल्पवयीन मुलगी होती. या सर्वांना जमावाने अचानक प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्याने ते गोंधळून गेले, यातील काहींनी त्यांची झडती घेतली असता त्यातील एकाकडे खेळण्यातील पिस्तूल सापडले. मात्र ते छऱ्याचे पिस्तूल आहे आणि हे लोक चोर आहेत व काहीतरी लपवत आहेत या गैर समजातून पारगाव येथील युवकांनी त्यांना मारहाण करण्यात सुरुवात केली.

गावात चोर आले आहेत आणि त्यांना पकडले आहे अशी बातमी गावात पसरताच एकच गर्दी जमली. हा सर्व प्रकार झाल्यानंतर काहींनी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या. या नंतर पोलिसांकडे या संशयित इसमांना देण्यात आल्यानंतर मात्र खरी माहिती समोर आली. सदर व्यक्ती ह्या आढाव आडनावाच्या एकाच कुटुंबातील असून जामखेड येथील जवळा येथून यात्रा उरकून पुण्याकडे निघाले होते. त्यांना पारगाव येथे अडवून विचारपूस करण्यात येऊन नंतर चोर असल्याच्या संशयातून मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

युवकांनो कुठेही हिरोगीरी करू नका, पोलिसांना बोलवा आणि त्यांना तपास करू द्या.. गेल्या काही काळामध्ये कायदा आपल्या हातात घेऊन निर्णय करायचे फ्याड फोफावत चालले आहे. त्यामुळे अश्या घटनांमध्ये जर एखाद्याचा जीव गेला तर याला जबाबदार धरून कायमचे आत जाऊ लागू शकते याचे भान युवकांनी ठेवायला हवे.

अश्यावेळी काय करावे.. एखाद्या गावात रात्रीच्यावेळी जर एखादी अनोळखी व्यक्ती दिसली तर सर्वप्रथम त्यांची चौकशी करा आणि जर ती व्यक्ती संशयास्पद वाटत असेल, माहिती देताना आढेवेढे घेत असेल तर त्यास बोलण्यात गुंतवून थेट पोलिसांना याची माहिती द्या. त्या व्यक्तीला मारहाण करू नका अथवा त्यास बांधून ठेवू न ठेवता जोपर्यंत पोलीस येत नाहीत तोपर्यंत त्याला बोलण्यात गुंतवून ठेवा. जर अशी व्यक्ती पलायन करू पाहत असेल तर त्याला पलायन करू देऊ नका आणि तुम्ही जर खरे बोलत असाल तर पोलीस माहिती घेऊन तुम्हाला सोडून देतील असा विश्वास त्यांना द्या. मात्र चुकूनही कायदा आपल्या हातात घेऊ नका.