राज्यसरकारने मंत्रिमंडळात घेतले महत्वाचे निर्णय | ‘दिवाळी’ निमित्त ‘आनंदाचा शिधा’ मध्ये या वस्तूंचाही समावेश, तर अल्पसंख्यांक विध्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठी मोठा निर्णय

मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळामध्ये विविध निर्णय घेण्यात आले असून यामध्ये दिवाळी सण, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती आणि विविध जिल्ह्यात भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. दिवाळी सण उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे त्यामुळे येत्या दिवाळी सणानिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार असल्याचे आणि त्या सोबत मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले आहे.

दुसरा निर्णय विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंपाबाबत असून या विभागातील वीज जोडण्या वेगाने पूर्ण करून उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. तर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार असून दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

यासोबतच नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येऊन ४५ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. तर इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येण्यासाठी विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.