उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ‛सुपे’ गावातच हरताळ! अवैध मटका, दारू धंदे जोमात, पोलिसांचा वरद हस्त असल्याची मोठी चर्चा

बारामती : बारामती तालुक्यात एकही अवैध धंदा दिसला नाही पाहिजे असे सक्त आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील महिन्यात बारामती दौऱ्यावर असताना पोलीस यंत्रणेला दिले होते. मात्र त्यांच्या या आदेशाची पायमल्ली सुपे गावामध्ये राजरोसपणे करण्यात येत असल्याचे येथील ग्रामपंचायतीच्या पत्रावरून सध्या समोर येई आहे.
सुपे गाव आणि परिसरामध्ये अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. येथे मुख्य पोलीस चौकी असूनही येथील अधिकाऱ्यांकडून फक्त लुटूपटूची दिखाऊ कारवाई होत असल्याने या अवैध धंद्यांना कायमची जरब बसत नाही त्यामुळे या धंद्यांना पोलीसांचाच वरद हस्त आहे की काय अशी चर्चा सुपे गावात रंगत आहे.
सुपे ग्रामपंचायतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि वडगाव निंबाळकर पोलीस निरीक्षकांना याबाबत पत्र पाठवले असून येथील दारू, मटका आणि इतर अवैद्यधंदे कायम स्वरूपी बंद व्हावेत अशी विनंती केली आहे.
वर्तमान पत्रात बातम्या आल्या की काही दिवस कारवाई दाखवली जाते आणि नंतर पुन्हा हे अवैद्यधंदे जोमात सुरू होतात त्यामुळे या अवैद्य धंदेवाल्यांना पोलिसांचा वरदहस्त असल्याची शंका येथील नागरिक व्यक्त करत आहेत.