पुण्यातील जमीन गैरव्यवहारात माझा संबंध नाही, पार्थ ने तो करार रद्द केला आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत सुरु असलेल्या मोठ्या घडामोडीत आता अजित पवार यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. मी सविस्तर माहिती घेतली आहे, या प्रकरणात माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कोणत्याही पद्धतीनं सहभाग नाही. यासंदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून अथवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झालेला नाही अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे.

हा फक्त प्राथमिक करार असून याविषयी कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नाही तसंच जमिनीचा ताबाही घेण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पार्थ पवार याने तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे असे पुढे अजित पवार यांनी म्हटले असून सदर प्रकरणाची शासन नियुक्त समितीमार्फत सखोल चौकशी होईल आणि जे असेल ते सत्य समोर येईल. कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

मी आजवर सदैव कायदा, नियम आणि पारदर्शकतेच्या चौकटीत राहून काम करत आलो आहे आणि पुढेही हीच मूल्ये जपत काम करत राहीन, असा विश्वास मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला देतो असे शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.