बारामती : बारामती शहरामध्ये विराज फायनान्स नावाने फर्म चालू करुन त्या द्वारे वेगवेगळ्या घटकातील लोकांनी घेतलेले लोन कमी करुन देतो अशी बतावणी करुन लोकांकडून पैसे घेउन त्याचा अपहार करुन लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


रविंद्र भिमराव डोंबाळे (रा.काटेवाडी ता. बारामती जि.पुणे) आणि त्याची पत्नी असे या दोन आरोपिंची नावे आहेत. या दोघांवर 2023 साली बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही आरोपिंचा पोलिसांनी वेळोवेळी शोध घेतला मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पोलीसांना गुंगारा देवून पळून जात होता.
त्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा प्रकटीकरण विभागाच्या पथकाने त्यास पकडण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते. सदर आरोपीला पकडण्यासाठी गोपनीय खबऱ्यांकडून माहिती मिळवत तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस पथकाने त्यास अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही संदिपसिंग गिल (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण) रमेश चोपडे (अप्पर पोलीस अधिक्षक पुणे), गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधिक्षक बारामती), सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती), श्रीशैल चिवडशेट्टी (पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतिष राऊत, पोलीस अंमलदार अमीर शेख, अभिजित कांबळे, दत्तात्रय मदने, अक्षय सिताप, गिरीष नेवसे यांनी केलेली आहे.







