दौंड : दौंड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे न कुठे चोऱ्या, घरफोड्या होत असल्याचे समोर येत आहे. रात्री होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या आता दिवसा ढवळ्या होऊ लागल्या आहेत. असाच एक घरफोडीचा प्रकार भांडगाव येथे घडला असून या घरफोडीमध्ये सुमारे 4 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
ही घटना दि.14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2:25 च्या दरम्यान आदीसाई हौसींग सोसायटी बिल्डींग मधील फिर्यादी माधुरी संतोष दोरगे (रा.भांडगाव, आदीसाई सोसायटी प्लॅट नं. १०८) यांच्या फ्लॅटमध्ये घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा फिर्यादी यांच्या घराच्या बाहेरील दरवाज्याचे कुलुप तोडुन घराच्या आतमध्ये प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी घरात असलेल्या लाकडी कपाटामध्ये फिर्यादी यांनी त्यांच्या आई, वडीलांचे ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने व कागदपत्र असा एकूण 4 लाख 65 हजार रुपयांचा माल घरफोडी करून चोरून नेला.
दिवसा ढवळ्या भांडगाव सारख्या गजबजलेल्या ठिकाणी इतकी मोठी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. यवत पोलिसांनी त्वरित अश्या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोसई मदने करीत आहेत.