मुंबई : त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागलेल्या भागांमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातील आढावा बैठकीत पोलिस महासंचालकांना दिले आहेत.
त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या राज्यात ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले आहेत. काही मोर्चांमध्ये हिंसक घटना घडल्याचे समोर आल्यानंतर गृहमंत्र्यांनी तातडीने याबाबत बैठक बोलावून राज्यातील जनतेला वरील आवाहन केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासनाने दक्ष राहण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.