पुणे/दौंड : (अब्बास शेख)
दौंड चे आमदार राहुल कुल हे आपल्या निर्भीड व्यक्तिमत्व आणि जनतेच्या सेवेसाठी संपूर्ण जिल्ह्यात (नव्हे संपूर्ण राज्यात) परिचित आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारीही त्यांचा कित्ता गिरवत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच काम करत असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे. अशीच एक घटना आज दुपारी घडली असून या घटनेमुळे आमदार ‛राहुल कुल’ यांच्या कार्यकर्त्यांची छाती मात्र गर्वाने फुलली आहे.
दौंड तालुक्यातील यवत येथे आज सोमवारी दुपारी एका अवजड वाहनाने दुचाकीला धडक देत दोन जणांचा बळी घेऊन ते वाहन पसार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बारामती च्या पळशी येथील राधा कऱ्हे (वय 35) आणि नाना कऱ्हे (वय 53) हे जागीच ठार झाले तर दादा कऱ्हे हे गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात ज्यावेळी घडला त्यावेळी त्याच रस्त्याने अपघात करून पळून जाणाऱ्या त्या वाहनाच्या पाठीमागून दौंडचे आमदार राहुल कुल यांचे स्वीय सहायक गुरुदत्त शिर्के हे एका वाहनातून प्रवास करत होते. अगोदर तर हा अपघात आपल्या डोळ्यासमोर झालाय आणि यात दोनजन चिरडले गेले आहेत यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. कारण त्यांनी मागून येताना पाहिले त्यावेळी दुचाकी स्वार हे रस्त्याच्या एका बाजूने साधारण वेगाने पुढे जात होते, मात्र अचानक मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अवजड वाहनाने त्यांना कट मारत त्यांना मागील टायर खाली घेतले आणि गुरुदत्त शिर्के यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.. कारण त्यांनी असा भयंकर लाईव्ह अपघात कधीच पाहिला नव्हता. अपघात घडताच त्यांना वाटले की ते अवजड वाहन आता थांबेल आणि अपघातातील जखमींना मदत करेल मात्र तसे न होता त्या अवजड वाहन चालकाने उलट वाहन जास्तच जोरात पळवायला सुरुवात केली. तो पर्यंत शिर्के हे अपघातस्थळी थांबून जखमींना मदत करावी यासाठी वाहन हळू करू लागले तेवढ्यात स्थानिक लोक जखमींना मदत करण्यासाठी येत असल्याचे त्यांनी पाहिले आणि आरोपी वाहन चालकाला पकडण्यासाठी त्यांनीही गाडी सुसाट वेगात सोडली. काही अंतरावर पुढे ते अपघाती वाहन जोरात जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी हॉर्न वाजवून ते वाहन बाजूला घेऊन थांबवण्याचा इशारा त्या वाहन चालकाला केला मात्र अपराध करून पळत असलेला वाहन चालक वाहन थांबविण्यास तयार नव्हता. अखेर गुरुदत्त शिर्के यांनी जोखीम पत्करत आपले वाहन त्या अवजड वाहनाच्या पुढे नेत ते वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, भांबावलेल्या त्या वाहन चालकाने शिर्के यांच्या गाडीवर ते अवजड वाहन घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नाईलाजाने शिर्के यांनी गाडी साईडला घेत त्या वाहनाचा नंबर मात्र टिपून घेतला… त्यामुळे जरी आज ते वाहन आणि वाहन चालक सापडले नाही तरी आज ना उद्या त्यांना त्या नंबरवरून यवत पोलीस शोधून काढतील यात शंका नाही. मात्र, दोन जणांचा बळी घेऊन पसार झालेल्या अवजड वाहनाचा पाठलाग करने आणि आपल्या जीवाची पर्वा न करता त्या मुजोर आणि भांबावलेल्या वाहन चालकाला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत थेट गाडी त्या अवजड वाहनसमोर थांबवणे वाटते इतके सोपे नाही. त्यामुळे आमदार राहुल कुल यांच्या धाडसाचे ज्यांनी किस्से पाहिले आहेत ते नक्कीच म्हणतील, “बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह”…