राजकीय व सामाजिक क्षेत्राला योग्य दिशा देण्याचे काम इतिहास करतो – आ.राहुल कुल

दौंड : केडगाव ता.दौंड येथील सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयामध्ये अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे 32 वे राष्ट्रीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्राला योग्य दिशा देण्याचे काम इतिहास करतो व साधनांचा वापर करून योग्य इतिहास समाजापुढे आणण्याचे आव्हान इतिहासकारांपुढे असल्याचे नमूद केले.

या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. अवनीश पाटील, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी पूर्व सुरीच्या इतिहासातील फटी ओळखून आत्तापर्यंत मांडलेल्या इतिहासाचा विस्तार करण्याची जबाबदारी नव संशोधकांपुढे असल्याचे सांगितले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग बलकवडे यांनी मराठ्यांच्या इतिहासावर बहुमोल मार्गदर्शन केले. प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम यांनी नव संशोधकांनी त्यांच्या पुढील आव्हाने स्वीकारून जिद्दीने व चिकाटीने संशोधन करावे असे सांगितले. या अधिवेशनामध्ये प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक विभागांची जबाबदारी अनुक्रमे डॉ. पद्माकर प्रभुणे, डॉ. लहू गायकवाड व डॉ. मंजुश्री पवार यांनी पार पाडली व या विभागांमध्ये सादर करण्यात आलेल्या सुमारे दीडशे शोधनिबंधांचे परीक्षण केले.

या अधिवेशनाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये रवींद्र जगदाळे यांनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, अशोक मानकर यांनी शिवकालीन व पेशवेकालीन मोडी कागदपत्रांचे प्रदर्शन तसेच डेक्कन कॉलेजच्या वतीने राजगड पायथ्यातील पाली येथील उत्खननात सापडलेल्या पुरातत्वीय वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव समाजामधील हरवत चाललेले शहाणपण शाबूत राखण्याची जबाबदारी इतिहास संशोधकांची असल्याचे नमूद केले. राजकीय व सामाजिक प्रदूषण रोखण्यासाठी खरा इतिहास लोकांपर्यंत आणण्याचे आव्हान नव संशोधकांनी स्वीकारावे असे आवाहन केले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या अध्यक्षा डॉ. अरुणा मोरे व सचिव डॉ. सोपान जावळे व डॉ. बी. डी. कुलकर्णी यांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे दोनशे इतिहास प्रेमींनी सहभाग नोंदवला. नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, सचिव धनाजी शेळके, खजिनदार सुभाष अवचट व सुजित पोखरणा तसेच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या कार्यकारिणीने यांनी या अधिवेशनाला विशेष सहकार्य केले. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक दिवेकर, अधिवेशनाच्या स्थानिक सचिव डॉ. शोभा वाईकर, डॉ. भाऊसाहेब गव्हाणे, डॉ. महादेव थोपटे, डॉ. भाऊसाहेब दरेकर, डॉ. नानासाहेब जावळे, डॉ. तन्वीर शेख, डॉ. राजेंद्र गायकवाड, प्रा. ओमकार अवचट, प्रा. अरविंद मिंधे, डॉ. विशाल गायकवाड, प्रा. शौर्या जगताप व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनुराधा गुजर यांनी केले व आभार प्रा. शौर्या जगताप यांनी मानले.