बादशहा शेख यांच्या समर्थनार्थ हिंदू महिला-बघीनी उतरल्या रस्त्यावर, ‘बादशहा’ हा गरिबांचा कैवारी, सारखा निवडून येतो म्हणून त्याच्याविरुद्ध कटकारस्थान केल्याचा महिलांचा आरोप

अब्बास शेख

दौंड : आमचा बादशहा गरिबांचा कैवारी हाय, त्यो कधी जातपात करत न्हाई, कुणाचं लग्न असो कि मयत त्यो प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील असतो साहेब, त्यो सारखा निवडून येतो म्हणून त्याला गुतवायचे कारस्थान केले आहे अशी संतप्त प्रतिक्रिया बादशहा शेख यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून पोलीस ठाण्यासमोर मोर्चा घेऊन गेलेल्या हिंदू महिला बघीनिंनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

व्हिडीओ – हिंदू महिला बघीनींना अश्रू अनावर

दौंड शहरातील कुंभार गल्ली येथे झालेल्या मारहाण प्रकरणात बादशहा शेख यांसह 20 जणांना आरोपी करण्यात येऊन त्यांच्यावर विनय भंग, ऍट्रॉसिटी, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. बादशहा शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना आज राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे.
बादशहा शेख यांना अटक करण्यात यावी यासाठी भाजप नेते नितेश राणे यांनी दौंड शहरात येऊन हिंदू संघटनांसह आंदोलन केले होते. यावेळी बादशहा शेख हे हिंदू लोकांवर अन्याय करत असल्याचे या आंदोलनात म्हटले गेले होते मात्र आजचे चित्र काही वेगळेच सांगून गेले.

बादशहा शेख ही व्यक्ती जातीवादी नसून तो गरिबांचा कैवारी असल्याचे येथील हिंदू माता बघीनिंचे म्हणणे होते. तर बादशहा शेख यांचे नाव या प्रकरणात मुद्दाम गोवले गेले असून ज्यांनी बादशहा शेख यांच्या परिवारातील महिला आणि युवकांना मारहाण केली त्यांच्यावर त्यांची तक्रार देऊनही अजून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले नाही मात्र बादशहा शेख व त्यांच्या परिवारातील लोकांवर मात्र त्वरित गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना तुरुंगात टाकण्यात आले असल्याचे मत या मोर्चातील महिलांनी व्यक्त केले. बादशहा शेख यांच्या परिवारातील लोकांना मारहाण करून महिलांचा विनयभंग करणाऱ्या संबंधित लोकांवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी या मोर्चातील महिलांनी केली आहे.

तर या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कारवाई करु असे आश्वासन यावेळी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिले आहे.

सविस्तर बातमी उद्याच्या अंकात…