दौंड | जाणीव हॉकर्स संघटनेचा महायुतीचे उमेदवार ‘आ. राहुल कुल’ यांना पाठिंबा

दौंड : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने शहरात चांगलाच वेग धरला आहे. विविध पक्ष, संघटनेच्या वतीने आमदार राहुल कुल यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. शहरातील जाणीव हॉकर्स संघटनेच्या वतीने सुद्धा महायुतीचे उमेदवार राहूल यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

शहरातील संघटनेमध्ये हातगाडीवाले, फेरीवाले, पथारीवाले, सायकल, स्टॉल वाले अशा साधारणता हजार सदस्यांचा समावेश असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राहुल त्रिभुवन यांनी दिली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राहुल कुल यांची भेट घेत त्यांना पाठिंबाचे पत्र दिले. पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, जाणीव संघटनेचे प्रमुख संजय शंके यांच्या मार्गदर्शनाने आम्ही दौंड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना पाठिंबा देत आहोत. कूल यांना निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पथविक्रेता कायद्यांतर्गत पथविक्रेता योजना 2024 शहरात राबवावी.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जाणीव संघटनेतील उमेदवारांना निवडून आणण्यात सहकार्य करावे, विधानसभेमध्ये हॉकर्स संघटनेसाठी आवाज उठवावा या मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. पथविक्रेता कायदा, पथविक्रेता योजना, पथविक्रेता धोरण निश्चित करण्यासाठी संघटना पाठिंबा देत आहे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

आमदार राहुल कुल यांना दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रावर संघटनेचे अध्यक्ष राहुल त्रिभुवन, उपाध्यक्ष वसीम तांबोळी ,निलेश मजगर ,सचिन कुलकर्णी ,सुनील शिंदे ,पाकीजा पठाण ,रेखा थोरात, सिंधू धीवर, मनोज साळवे आदींच्या सह्या आहेत.

आमदार राहुल कुल यांना शहर व तालुक्यातील आंबेडकरी विचारधारा असणाऱ्या पक्ष व दलित संघटनांनी एकमुखी पाठिंबा दर्शविल्यानंतर राहुल कुल यांच्या शहरातील प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. शहरातून राहुल कुल यांना इतरही संघटनांकडून चांगलाच प्रतिसाद मिळू लागला असल्याचे दिसते आहे.