हडपसर उड्डाणपुलाच्या दुरुस्तीमुळे मोठी वाहतूक कोंडी! नागरीकांचे हाल होत असल्याने वाहतूक पोलिसांना व्हिजन हडपसरचे निवेदन

पुणे : हडपसर मधील उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू असल्याने या महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे, वाहतुक कोंडीच्या यातनेतून सुटका व्हावी म्हणून व्हिजन हडपसरच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाहतूक सुधारणा करण्याबाबत मागण्या मांडल्या, पोलीस अधिकारी मनीषा झेंडे यांनी सर्व मागण्या सकारात्मक ऐकून घेत तातडीने सुधारणा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी व्हिजन हडपसर अध्यक्ष अनिल मोरे, सेक्रेटरी दिगंबर माने, उपाध्यक्ष दिपक कुदळे, दिपक गायकवाड, तुषार पायगुडे, रोहिणी भोसले, पल्लवी सुरसे, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, संजय ओसवाल आदी उपस्थित होते.

यावेळी व्हिजन हडपसरच्या शिष्टमंडळाने हडपसर वाहतुककोंडी व वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने पर्यायी रस्ते, एकेरी मार्ग, वाहतूक पोलीस व वार्डन नेमणूक करून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी उपाय करण्याचे आवाहन केले तसेच पुलाचे काम दिवसरात्र व्हावे आणि तांत्रिक काम झाल्यास दुचाकी व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना उड्डाणपूल खुला करावा अशी आग्रही भूमिका घेतली.

पुणे महापालिकेकडून मागणी करूनही वार्डन पुरवले जात नाहीत, सहकार्य होत नाही पत्रव्यवहार करून महिना लोटला तरी प्रतिसाद देत नाहीत वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण येत असल्याने कर्मचारी आजारी पडत असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी सांगितले.

हडपसर वाहतूक बाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून लवकर काम व्हावे आणि अत्यावश्यक वाहनांसाठी उड्डाणपूल खुला व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे व्हिजन हडपसर च्या शिष्टमंडळाने सांगितले.