अख्तर काझी
दौंड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, पैगंबर जयंती, नवरात्र उत्सव तसेच इतर सण ,उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत. आणि त्यामध्ये आपण सर्वच सहभागी होणार आहोत. त्यामुळे गणेशोत्सव असो किंवा इतर कोणताही उत्सव असो यावेळी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने उत्सव साजरा झाला पाहिजे. गणेशोत्सव साजरा करताना आपल्या उत्साहामुळे कोणाच्या दैनंदिन जीवनामध्ये फरक पडणार नाही, त्याचे नुकसान होणार नाही, त्याला इजा पोहोचणार नाही अशा पद्धतीने साजरा करा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले आहे.
दौंड पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बिरादार यांनी मार्गदर्शन करताना मंडळांना मोलाचा सल्ला दिला. यावेळी दौंड चे उपविभागीय पो.अधिकारी अण्णासाहेब घोलप, दौंड चे प्रभारी पो. निरीक्षक रामागरे, महावितरण कंपनीचे चव्हाण, नगरपालिकेचे शाहू पाटील, तालुक्यातील गावांचे पोलीस पाटील तसेच मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेश बिरादार म्हणाले की, भारतीयांना ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त करण्यासाठी लोकांनी एकत्र यावे व यावेळी त्यांना योग्य तो संदेश देता येईल हा उद्देश समोर ठेवून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याकाळी गणेशोत्सवामध्ये विधायक कार्य होत होते. परंतु आत्ताच्या गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे, असे असले तरी त्याला कुठेतरी मर्यादा असावी. मंडळांच्या डीजेमुळे बहिरेपण आल्याची उदाहरणे समोर येत आहेत, लेझर, बिमलाईटच्या वापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो आहे हे वारंवार समोर येत आहे. याचा वापर मंडळांनी टाळला पाहिजे. सध्याची युवा पिढी व्यसनांच्या आहारी गेली आहे, त्यामुळे चुकीचे मार्ग ते अवलंबित आहेत. त्यांना याचे दुष्परिणाम समजावून त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी गणेशोत्सवा दरम्यान मंडळांनी मार्गदर्शनपर विधायक उपक्रम राबवावेत.
स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन अधिकारी झालेल्यांचे व्याख्यान कार्यक्रम आयोजित करावेत. जेणेकरून या अधिकाऱ्यांचे अनुभव व मेहनत ऐकून युवा पिढीचे मन परिवर्तन होईल व ते चुकीचा मार्ग सोडून यशस्वी अधिकारी बनवण्याचे स्वप्न बघतील व तसे प्रयत्नही सुरू करतील. सध्या महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशी दुष्कृत्य करणाऱ्या आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होते. .त्यामुळे अशा घटनांपासून युवा पिढी दूर राहावी यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले गेले तर उत्सवाचे सार्थक होईल असेही बिरादार म्हणाले. तुम्ही शांत…. तर आम्ही शांत. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था पाळावी. कायदा मोडून स्वतःवर गुन्हे दाखल करून घेऊ नयेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर हाती असलेली नोकरी गमवावी लागते किंवा मिळणारी नोकरी मिळत नाही हे कार्यकर्त्यांनी समजून घ्यावे असा मोलाचा सल्लाही बिरादार यांनी यावेळी दिला.
उपविभागीय पो. अधिकारी अण्णासाहेब घोलप मार्गदर्शन करताना म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी, कार्यकर्त्यांनी कोणती कार्यपद्धती वापरावी व काय दक्षता घ्यावी या सूचना देण्यासाठीची ही बैठक बोलाविली . शहर व तालुक्यातील प्रत्येक मंडळांनी पोलीस प्रशासनाकडे नोंद करणे बंधनकारक आहे, आपल्या मांडवांचा त्रास शहरातील वाहतुकीला होणार नाही असे मांडव मंडळांनी टाकावेत. गणेशाची स्थापना झाल्यापासून विसर्जन दिनापर्यंत गणेश मूर्तींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे याबद्दल मंडळांना सूचना दिलेल्या आहेत. ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता प्रत्येक मंडळाने घ्यावयाची आहे. जी मंडळे सामाजिक उपक्रम राबवितात त्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांना पोलीस प्रशासनातर्फे बक्षिसे देण्यात येणार आहेत. गणेशोत्सवा दरम्यान शहरातील मंडळे, सर्वच समाजातील प्रमुख मंडळी, सामान्य नागरिक पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील व आपण सर्व मिळून गणेशोत्सव शांततेत पार पाडू असेही घोलप म्हणाले.