दौंड : दौंड तालुक्यातील खोर हद्दीमध्ये एका महिलेवर पाच नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत महिलेची फिर्याद येताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी धस यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक तावरे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे यांच्या सोबत व्यूहरचना आखून सर्व 5 आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक केली आहे.
पीडित महिला ही तिच्या पतीसोबत एके ठिकाणी जेवायला गेली असताना आरोपींनी हॉटेल बाहेर थांबलेल्या महिलेला तुमच्या भावाचा अपघात झाला असून तो इकडे जखमी अवस्थेत असल्याचे सांगून तिला गाडीवर बसवून अज्ञात स्थळी नेले. तिने आरडा ओरडा करेपर्यंत त्यातील पहिल्या आरोपीने तिच्यावर अमानुष बलात्कार केला यानंतर तेथे उपस्थित असलेल्या अन्य चार आरोपींनीही त्या महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. हा सर्व प्रकार तिने आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी थेट यवत पोलीस ठाणे गाठून तेथे पीडित सामूहिक बलात्काराची फिर्याद दिली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घालत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या 12 तासांत यातील 5 आरोपी जेरबंद केले आहेत. यातील आरोपींचे वय हे 22 ते 32 च्या दरम्यान असून चार आरोपी खोर येथील तर एक आरोपी गिरीम येथील असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.