अख्तर काझी
दौंड : शहरात कल्याण मटका जुगार, पत्त्याचा क्लब, गावठी दारू विक्री अड्डा चालविणाऱ्या विरोधात दौंड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाईच्या सूचना केल्याने पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे पहायला मिळत आहे. पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरू केले असून जुगार अड्डा मालकांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 18 मार्च रोजी पोलीस पथकाने शालीमार चौकातील दत्त मंदिर परिसरात तसेच घंटाचाळ भागात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर धाड टाकून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. जुगार अड्डा चालविणारे विल्यम अंतोनी आरीकम, विकी भगवानदास चव्हाण (रा. अग्रवाल बंगल्याजवळ, शालिमार चौक दौंड), अतुल सुभाष कांबळे (रा. जगदाळे वस्ती, दौंड) अनिल नामदेव सोनवणे (रा. बारामती लाईन, जगदाळे वस्ती ,दौंड) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची दिली आहे.
त्याचप्रमाणे दिनांक 19 मार्च रोजी येथील वडार गल्ली, गोवा गल्ली परिसरातील गावठी दारू विक्री अड्ड्यांवर, गांधी चौक येथील पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर तसेच कुरकुंभ मोरी परिसरात कल्याण मटका आकड्यांचा जुगार घेणाऱ्यावर दौंड पोलिसांनी कारवाई केली. गावठी दारू विकणाऱ्या मुक्ता पोपट गायकवाड, कल्पना श्याम जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या मुन्ना इकबाल शेख, अशोक रामा गुपुते, शुभम भीमसेन वांभिरे, आकाश फकीर अप्पा मेगनकेरी व कल्याण मटक्याचे आकडे घेणारा सोहेल अन्वर सय्यद यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.