अख्तर काझी
दौंड : शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष योजनेतून उद्योजकता आयुक्तालयाच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, अमोल जगताप यांच्या पुढाकाराने येथील लाभार्थी शेतकरी बांधवांना फवारणी पंपाचे मोफत वाटप करण्यात आले.
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम, योजना राबविल्या जातात. त्या अनुषंगाने फवारणी पंप मिळावेत म्हणून येथील शेतकऱ्यांनी उद्योजकता आयुक्तालय कार्यालयाकडे अर्ज केले होते. यापैकी मंजूर झालेल्या लाभार्थींना आज दि. 14 मार्च रोजी येथील हरी ओम उद्योग समूह कार्यालयाच्या प्रांगणात या फवारणी पंपाचे वाटप करण्यात आले. आज पहिल्या टप्प्यातील लाभार्थींना पंप वितरित करण्यात आले आहेत, उर्वरित लाभार्थींना एप्रिल महिन्यात फवारणी पंपाचे वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी पतित पावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजेश पाटील, शिवसेना(उ. बा.ठा.) पक्षाचे दौंड विधानसभा संघटक संतोष जगताप तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक रोहित पाटील व अमोल जगताप यांनी यावेळी शेतकरी बांधवांसाठीच्या शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली, लाभ मिळवण्यासाठीचे मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनांमधून येथील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहन घोरपडे, शैलेश पिल्ले ,रवींद्र बंड, राकेश भोसले, महेश गुणवरे, उमेश जगताप, अनिस पठाण, प्रथमेश कदम, आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.