यवत प्रतिनिधी (समीर सय्यद) : केंद्र आणि राज्य सरकार मार्फत देशातील व राज्यातील अनेक गरजू रुग्णांसाठी विविध शासकीय योजना शासकीय रुग्णालयांमध्ये राबविल्या जातात. याच राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत यवत ग्रामीण रुग्णालयामध्ये किडनीच्या आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांकरिता मोफत डायलिसिस करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
यवत येथील ग्रामिण रुग्णालयात ‘महाडायलेसिस आरोग्याची हमी मोफत डायलेसिस केंद्र’ यवत ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी पाच मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या मशीनद्वारे दिवसभरात दहा रुग्णांची डायलेसिस करण्यात येऊ शकतात. ही सेवा 9/12/2024 पासून सुरू करण्यात आली. आतापर्यंत 80 रुग्णांची डायलिसिस या ठिकाणी करण्यात आलेली आहे. डायलिसिस करत असताना या ठिकाणी सीनियर आणि ज्युनिअर डॉक्टरांची टीम उपलब्ध असते. ही सुविधा सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुट्टीचा दिवस वगळून चालू असते.
डायलेसिस करण्याकरिता खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च आकारण्यात येतो. येथे येणाऱ्या रुग्णांची संपूर्ण खर्चाची बचत या ठिकाणी होणार आहे. या योजनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणि याची गरजू रुग्णांना माहिती होण्यासाठी दौंड तालुका आणि परिसरातील सर्व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि रुग्णांना आवाहन करण्यात आलेलं आहे.
एक दिवसात जास्तीत जास्त 10 लोकांचं डायलिसिस आपण करू शकतो. अगदी विनामूल्य ही सेवा उपलब्ध असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पत्की यांनी ‘सहकारनामा’ प्रतिनिधिशी बोलताना दिली. ही योजना चालू व्हावी म्हणून दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार ॲड. राहुल कुल यांनीही विशेष प्रयत्न केल्याने त्यांचेही रुग्णालयाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.