मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे त्यांना भ्रष्टाचार आणि 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते. त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र तरीही 10 दिवस त्यांना तुरुंगात काढावे लागणार आहेत.
या जामीनाविरोधात सीबीआय ने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 10 दिवसांची स्थगिती मिळावी अशी मुदत मागितली होती. त्यास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. सक्तवसुली संचलनालय (ED) ने दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी देशमुख यांना जामीन मिळाला होता. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अनिल देशमुख हे आपल्या घरी परत जाता येणार असल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष सुरु झाला आहे.
एक वर्षांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडी (ED) कडून त्यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांना जामीन मंजूर झाला असला तरी बाहेर येण्यासाठी 10 दिवस वाट पहावी लागणार आहे.