अख्तर काझी

दौंड : सध्या दौंड शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहे. आपल्या पक्षाचे पॅनल मजबूत करण्यासाठी आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया( नागरिक हित संरक्षण मंडळ ,आरपीआय ,पीआरपी आघाडी )तसेच माजी आमदार रमेश थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी काँग्रेस) गटाने कंबर कसली आहे.
अशा परिस्थितीत आमदार राहुल कुल, प्रेमसुख कटारिया आणि बादशहा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला शहरात मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष वसीम शेख यांनाच या त्रिकुटाने आपल्या पॅनलमध्ये आणून सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. या प्रक्रियेमध्ये बादशाह शेख यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. शहरात झालेल्या एका कार्यक्रमात वसीम शेख यांनी नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडीत प्रवेश केला आहे.
यावेळी आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, बादशहा शेख, योगेश कटारिया तसेच माजी नगरसेवक इस्माईल शेख ,राजेश गायकवाड, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे उपस्थित होते. वसीम शेख यांच्या नागरिक हित संरक्षण मंडळातील प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली असून नगरपालिका निवडणुकीमध्ये शहरात एक वेगळाच निकाल लागण्याचे हे संकेत आहे असे बोलले जात आहे.







