अख्तर काझी
दौंड : भारतीय जनता पार्टीचे माजी दौंड शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांनी भाजपा ला सोडचिट्टी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे. दि.17 ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंड मध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे स्वप्निल शहा यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केले.
पत्रकार परिषदेत स्वप्निल शहा म्हणाले की, मी भाजपा मध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केले, पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या उत्तमरीतीने पार पाडण्याचा प्रयत्न केला. आमदार राहुल कुल तसेच पक्षातील कोणत्याच पदाधिकाऱ्यांबरोबर माझे वैयक्तिक वाद नाही, परंतु काही कारणास्तव मी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय झाल्यानंतर मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही मी संपर्कात होतो.
अजित पवार यांच्या कामाचा झंझावात पाहून मी प्रभावित झालो आहे आणि त्यामुळे अजित दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या आदेशाप्रमाणे पक्षाचे एक निष्ठेने काम करणार असून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार आहे. दौंडच्या आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व इतर सदस्य निवडून आणण्यासाठी मी आणि माझ्यासोबत भाजपा सोडून आलेले माझे सर्व सहकारी प्रयत्न करणार आहोत असे शहा यांनी सांगितले.
दि. 17 ऑक्टोबर रोजी दौंड मध्ये अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये मी आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक नंदू पवार व माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहोत असेही स्वप्निल शहा म्हणाले. आगामी दौंड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वप्निल शहा आणि नंदू पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षात प्रवेश केल्याने पक्षाला निश्चितच फायदा होईल असे बोलले जात आहे.