दौंड / पाटस : पंढरपूरला जाणारे वारकरी, भाविक भक्तांच्या वाहनांना टोल मधून सूट देण्याचे शासनाने आदेश दिले असताना आणि ते आदेश पोलिसांनी पाटस टोल प्लाझाला दिले असतानाही अरेरावी करून वारकऱ्यांच्या वाहनांना टोल आकारणे पाटस टोल प्लाझा मॅनेजमेंटच्या चांगलेच अंगलट आले असून टोल आकारणाऱ्या मॅनेजमेंटच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस (दौंड) टोल प्लाझावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केल्याप्रकरणी टोल प्लाझाचे प्रमुख अजितसिंग ठाकूर, बालाजी (कैलास) वाघमोडे, सुनील थोरात आणि विकास दिवेकर अश्या चार जणांविरोधात शासनाच्या आदेशाचा आणि पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे शासनाने दोन दिवसांपूर्वी आदेश काढून आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही पाटस टोल प्लाझाकडून वारकऱ्यांच्या वाहनांना टोल आकारल्याचा प्रयत्न झाला असल्याने परीसरात आश्चर्य व्यक्त केले जात होते. यावर अनेकांनी आवाज उठविल्यानंतर मात्र अखेर पाटस टोल प्लाझाच्या प्रकल्प प्रमुखासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.
पाटस टोल प्लाझावर नुकतेच आंदोलन करण्यात आले असून यामध्ये तालुक्यातील लोकल वाहनांना सूट देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाचा आदेश असूनही जर त्या वाहनांना टोल आकारला जात असेल तर मग येथील आंदोलकांचे म्हणणे किती ऐकले जाईल याबाबत येथील नागरिकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.