अब्बास शेख
पुणे : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कुणाचा मित्र ही नसतो त्यामुळे कोण, कधी कसा एखाद्याचा राजकीय गेम करेल याची शाश्वती कुणालाच नाही. याचे ताजे उदाहरण सध्याच्या राजकीय उलथापालथीवरून नक्कीच सर्वांच्या लक्षात येत आहे. मात्र हे गणित 14 वर्षांपूर्वीच म्हणजे 2009 ला दौंडचे आमदार राहुल कुल यांनी ओळखले होते. आणि त्यातच त्यांना राजकीय पक्षांच्या बेभरवश्याचा जबर अनुभव आल्याने त्यांनी आपल्या तालुक्याचा विकास करणाऱ्या आणि आपल्याला कायम साथ देणाऱ्या पक्षाचा शोध सुरू केला होता ज्यात ते नंतर अनेकांपेक्षा उजवे ठरले आहेत.
कुल यांनी पक्षीय धोरणांचा आणि त्यात होणाऱ्या घुसमटीचा अनुभव घेऊन 2014 ची निवडणूक स्वबळावर रासप पक्षाकडून लढवत बाजी मारली मात्र त्यावेळीही त्यांना काही वेगळे अनुभव आले ज्यावरून त्यांची राजकीय परिपक्वता वाढत जाऊन जर तालुक्याचा विकास करायचा असेल तर असा पक्ष हवा जो थेटपणे तालुक्याला जास्तीत जास्त निधी देईल, तालुक्याच्या जडणघडणीत त्याचा मोठा वाटा राहील आणि जनतेची कामे मार्गी लागतील अश्या पक्षाचा शोध त्यांनी सुरू केला. यावेळी त्यांना भाजप हा साथ देणारा, कार्यकर्ते, नेत्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभा राहणारा, अंतर्गत कुरखोडी जाग्यावर मिरवणारा सक्षम पक्ष असल्याचे त्यांना जाणवले. भाजप मध्ये जाऊ नये, नुकसान होईल असे त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांनीही कुल यांच्या कानावर ही बाब घातली होती मात्र, हा राज्यात असा पक्ष राहील ज्याच्या सरकारमध्ये मित्रच काय पण विरोधी पक्षही सामील होण्यास उत्सुक असतील असे मत त्यावेळी आ.कुल यांनी वर्तवले होते.
त्यामुळे कुल यांनी 2019 ला ऐनवेळी भाजप पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्यात त्यांनी विजयही मिळवला. त्यांना हा विजय मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कारण दौंड तालुक्यामध्ये भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे तो इतर धर्मियांची कामे करणार नाही म्हणून त्याची चर्चा होत होती आणि त्यामुळे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन व इतर समाज त्यांना मतदान करतील की नाही याची खात्री नव्हती. मात्र या समाजांतील प्रमुख घटकांना आ. राहुल कुल यांनी काही आश्वासने दिली होती आणि एक व्हिजन आखले होते. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून लोकांनीही चिन्हा ऐवजी चेहऱ्याला पसंती देत कुल यांना मते दिली आणि त्यावेळी जिल्ह्यात भाजप ची परिस्थिती बिकट असतानाही कुल यांचा मात्र दौंडमध्ये विजय झाला. या विजयानंतर मात्र राहुल कुल यांनी आघाडीचे सरकार असतानाही विकास कामे आणि कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांची कामे होऊ लागली आणि जो डाग भाजपवर लागला होता तो या तालुक्यात मात्र पुसला जाऊ लागला.
आघाडी सरकार नंतर राजकीय उलथापालथ होऊन भाजप-युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आणि कुल यांच्या व्हिजनवर यावेळी भाजप ने त्यांना मोठी साथ देण्यास सुरुवात केली ती आजपर्यंत सुरू आहे. त्यामुळे जी सर्व समावेशक विकासकामे झाली, कारखाना सुरू झाला, रस्ते झाले ते पाहता आमदार राहुल कुल यांनी त्यावेळी भाजपमध्ये जाण्याचा जो निर्णय घेतला होता तो एकदम बरोबर होता हे आता त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि सर्व धर्मातील लोकांनाही कळून चुकले आहे. सध्या भाजप सोबत सत्तेत जाण्यासाठी नेते आणि पक्षांमध्ये लागलेली चढाओढ पाहता कुल यांनी त्यावेळी घेतलेला निर्णय हा योग्य होता आणि या निर्णयामुळे ते त्यांच्यापेक्षा जेष्ठ असणाऱ्या नेत्यांनाही उजवे ठरले आहेत हे मात्र विरोधकही खाजगीत कबुल करतात यात शंका नाही.