दौंड : सहकारनामा ऑनलाईन
‛कोरोना व्हायरस’चा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगार आणि मजुरांच्या रोजी रोटीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. त्यामुळे त्यांना सध्या मदतीची मोठी गरज भासत आहे आणि अनेक सामाजिक कार्यकर्तेही आता यासाठी पुढे सरसावत असल्याचे दिसत आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव मध्येही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दोन तरुणांनी सुमारे ४० बांधकाम कामगार आणि मजुर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांना पुढील 3 महिने संपूर्ण जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याची जबाबदारी हाती घेतली आहे. केडगाव-बोरीपारधी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि श्री.गणेश एच.पी.गॅस चे वितरक संपतराव मगर आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल पितळे अशी या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तरुणांची नावे असून त्यांच्यावतीने आज मंगळवारी सायंकाळी ४० बांधकाम मजूर आणि कामगार कुटुंबांना तूरडाळ, मुगडाळ, प्रत्येकी १० किलो तांदूळ,१ किलो तेल, कांदा, बटाटा, गवार, दोडकी, मीठ मिर्ची, मसाल्याचे पदार्थ, हळद, या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच तीन पोते तांदूळ ग्राप सदस्य नितीन जगताप यांना देऊन तो तांदूळ त्यांनी गरीब, गरजू लोकांना वाटावा अशी सूचना करण्यात आली. या कार्यक्रमावेळी दौंडचे तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी गणेश मोरे, केडगावचे मंडलाधिकारी रमेश कदम, केडगावचे ग्रामविकास अधिकारी संदीप लांडगे, बोरी पारधीचे तलाठी विनायक भांगे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रवींद्र जराड हे आवर्जून उपस्थित होते.