दौंड : सध्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे, तर घरगुती गॅस आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या भाव वाढीने अक्षरशा गृहनींची वाणी बंद व्हायची वेळ आली आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असून अच्छेदिनची स्वप्ने दाखवणाऱ्या सरकारने हे कोणते दिन आणले आहेत असा सवाल बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे. त्या दौंड तालुक्यातील देशमुखमळा, केडगाव येथे गावभेट उपक्रमाअंतर्गत आयोजित बैठकीदरम्यान ग्रामस्थांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिला दिनानिमित्त महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या तर ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांच्या घरी सरळ साधेपणाने भोजनाचा आस्वाद घेतला.
यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्षा वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, योगिनी दिवेकर, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, रामभाऊ टुले, विकास खळदकर, तुषार थोरात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांचा हा नियोजित गावाभेट दौरा होता. यावेळी त्यांनी वाखारी, केडगाव, चौरंगीनाथ मठ, जगताप वस्ती अश्या विविध ठिकाणी भेटी दिल्या.
खा.सुप्रिया सुळे यांनी अच्छेदिनची खिल्ली उडवताना, यांनी 400 रुपयांचा गॅस 1100 रुपयांवर नेला, 60 रुपयांचे पेट्रोल 106 च्या पुढे नेले सगळीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे आणि तरीही याला जर का हे अच्छेदिन म्हणत असतील तर मग बुरे दिनची व्याख्या यांनी आम्हाला समजून सांगावी असे म्हटले आहे.
सध्या शेतकरी त्यांच्या पिकांना भाव नसल्याने मेटाकुटीला आला आहे, त्यातच अवकाळीने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळणे गरजेचे असून दररोज लागणाऱ्या वस्तूंची भाव वाढ आणि वाढत चाललेली महागाई ही सर्वसामान्य जनतेला अक्षरशा पिळून घेत आहे.