कानगाव (दौंड) : कांदा पिकाला ३५ रुपये हमीभाव मिळावा व इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे कानगाव (ता. दौंड, पुणे) या ठिकाणी गुरुवार दिनांक १८ / ९ / २०२५ पासून शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
या आंदोलनात कांद्याला ३५ रुपये बाजार भाव मिळावा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये भाव मिळावा, भाकड जनावरे, गाई, म्हशी, वासरे यांचे शासकीय खरेदी केंद्र सुरू करावे, क्षारपड जमिनीसाठी पाझर चाऱ्या व पानंद रस्ते तयार करण्यात यावे, कापसाला १२ हजार रुपये प्रति क्विंटल व सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा, गाईच्या दुधाला ७० रुपये व म्हशीच्या दुधाला १०० रुपये बाजार भाव मिळावा अशा विविध मागण्या शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे गुरुवार दिनांक १८/९/२०२५ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे भानुदास शिंदे यांनी दिली आहे. यावेळी रामदास पवार, सयाजी मोरे, भाऊसाहेब फडके, संतोष गवळी, एकनाथ शेलार हे उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे व मागण्यांच्या कडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीतर्फे तर्फे बेमुदत धरणे आंदोलन, आमरण उपोषण,चक्रीय उपोषण,मार्केट बंद आंदोलन,रास्ता रोको, रेल्वे रोको बोंबाबोंब आंदोलन अशा प्रकारची आंदोलने मागण्या मान्य होईपर्यंत करण्यात येणार आहे.