वरवंड येथील गांधी यांच्या खुनानंतरही मोठी मांडवली ! व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसाने केले भंडारी कुटुंबियांना ब्लॅकमेल, आता आहे ही परिस्थिती

अब्बास शेख

दौंड : वरवंड येथील राहुल भंडारी यांचे सासरे सुरेश गांधी यांचा फॉरेस्ट जमिनीत नेऊन खून करण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार तब्बल एक वर्षानंतर एका व्हिडीओमुळे उघडकीस आला होता. आता पुन्हा एकदा या खून प्रकारनाच्या निगडित नवीन माहिती समोर आली असून एका पोलीस शिपायावर आता राहुल बबनलाल भंडारी (वय 42 वर्ष व्यवसाय पेपर एजन्सी रा. वरवंड, शिवाजी चौक ता. दौंड जि.पुणे) यांच्या फिर्यादीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर गोविंद शिंदे (रा.वरवंड ता. दौंड जि.पुणे ( पोलीस शिपाई पुणे शहर ) असे या आरोपी पोलीस शिपायाचे नाव असून तो सध्या फरार आहे.

राहुल भंडारी यांचा भाऊ राकेश व त्याच्या मित्रांनी दिनांक 27/03/2022 रोजी राहुल यांचे सासरे सुरेश नेमचंद गांधी यांचा फॉरेस्ट च्या जागेत नेऊन त्यांचा गळा दाबून खून केला होता. हा खून करते वेळीचा एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तुमच्या घरातील सर्वांना खूनाच्या गुन्ह्यात गुंतवितो तसे करायचे नसल्यास 15 लाख रोख द्या अशी धमकी देऊन फिर्यादी तसेच त्यांची पत्नी सपना यांच्या समक्ष आरोपी पोलीस शिपाई सागर गोविंद शिंदे याने फिर्यादीचा भाऊ राकेश याच्याकडून रोख स्वरूपात 8 लाख रुपये खंडणी घेतली होती.

याबाबत फिर्यादी राहुल भंडारी यांनी आरोपी पोलीस शिपाई सागर गोविंद शिंदे याच्या विरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीस शिपाई सागर शिंदे याच्यावर या अगोदरही यवत पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 354, 341, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल होता ज्यामध्ये आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करित आहेत.