अख्तर काझी
दौंड : मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा (बकरी ईद) मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी केली. ईदच्या नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मिरवणुकीने (जुलूस) येथील ईदगाह मैदानावर आले. या जुलूस मध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होते.
जामा मशिदीचे मौलाना मुबीन आतार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली. यावेळी मौलानांनी संपूर्ण देशामध्ये भाईचारा व शांतता नांदावी म्हणून अल्लाहकडे प्रार्थना केली. अल्लाह.. संपूर्ण देशामध्ये भाईचारा व जातीय सलोखा अबाधित ठेव, देशात शांतता नांदू दे, जे अडचणीत आहेत, आजाराने त्रस्त आहेत अशांना तू सर्व त्रासातून मुक्त कर, आम्हाला चांगल्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी दे अशी दुआ मौलाना यांनी यावेळी मागितली.
ईद मिलन कार्यक्रमासाठी आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, इंद्रजीत जगदाळे, पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार तसेच येथील राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.